top of page
Search

आमची भ्रमंती - मढे घाट, महाराष्ट्र

Updated: Mar 8, 2021

मढे घाटाला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. शिवाजी महाराजांच्या शूर सरदारांपैकी एक सरदार नरवीर तानाजी मालुसरे ह्यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी म्हणजे उमराठे, पोलादपूर ह्या ठिकाणी ह्याच मढे घाटातून नेण्यात आले होते . पुणे ते महाड हा रस्ता मढे घाटातून प्रस्तावित आहे व रस्त्याचे बांधकाम सध्या चालू आहे. (तसेही ते कायम सुरूच असते) ह्या ठिकाणी भेट देण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पावसाळा (जुलै ते सप्टेंबर ) हा सुंदर ऋतु आहे. पुण्यापासून साधारण ५५-६० की. मी. अंतरावर रायगड जिल्ह्याच्या सीमारेषेजवळ असलेला हा निसर्गरम्य भाग उत्तम वीकेन्ड साठी उत्तम पर्याय आहे. थोडा जास्त वेळ ठेवला तर आपण तोरणा, राजगड सारखे किल्ले तसेच गुंजवणी धरणाला हि भेट देऊ शकतो. पाबे घाट, वेल्हे गाव, भट्टी घाट व मढे घाट असे तीन घाट लागतात. रस्ते मधून मधून खराब आहेत पण एकूणच निसर्ग सानिध्यात प्रवासाचा क्षीण जाणवत नाही. उन्हाळ्यात गेलात तर रानमेवा भरपूर मिळतो. करवंदाची भरपूर झाडे, रान आंब्याची झाडे खूप आहेत. त्याची मजा लुटू शकता.

कुंद पावसाळा असो वा धुवाधार पाऊस प्रत्येक घाटाचे निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे. पूर्ण घाट रस्ते अनेक छोटया मोठ्या धबधब्यांनी, हिरव्यागार झाडांनी आपल्या स्वागताला सज्ज असतात. ह्या भागात भातशेती जास्त प्रमाणात होते, त्यामुळे पाण्यात डोलत असलेली हिरवीगार भातशेती, त्यात डोईवर पोत्यांचे ईरले घेऊन भातखाचरात पेरणीचे काम करणारे शेतकरी, मधून मधून दिसणारी पाण्याने तुडुंब भरलेली शेततळी, अहाहा … काय वर्णावे, प्रत्येक शेतामधून पाटाचे पाणी खळाळत असते. शेती मधून तांदळाचा सुगंध वाऱ्याबरोबर दूरवर पसरलेला असतो. इंद्रायणी तांदूळ चे पीक येथे जास्त घेतात. येता जाता हातसडीच्या तांदळाचे छोटे मोठे उद्योग दिसतात. अधून मधून खेड्यातली छोटी छोटी कौलारू घरे डोकावतात. एकूणच प्रवासात निसर्गाची किमया म्हणजे काय ह्याचा प्रत्यय येतो. अशा अनेक जागा आहेत जेथे आपण क्षणभर थांबून धबधब्यात खेळू शकतो. दूरवर तोरणा, राजगड व सह्याद्रीच्या डोंगररांगांचे धुक्यांमधून होणारे विलोभनीय दर्शन सुखावून जाते. तऱ्हेतऱ्हेच्या वृक्षराई मधून, गार हवेचा स्पर्श, मृद्गंध, घेत आपण पाबे, वेल्हे, भट्टी, केळद असे करता करता शेवटी मढे घाटात पोचतो. अधून मधून हिरव्यागार कुरणांमधून रस्ता अथांग पसरलेल्या धरणाच्या जलाशायाचे दर्शन देत जातो. विविध प्रकारची रानफुले रंगांची उधळण करत असतात. अनेक पाणपक्षी छोट्या तळ्यामध्ये विसावलेले असतात. गाडी रस्त्याच्या कडेला लावून पुढे चालत गेल्यास मढे घाटातील सर्वात मोठा धबधबा जो साधारण २५०० फुटांवरून धबाबा दरीत कोसळत असतो त्याचे दर्शन होते. सर्वात शेवट एक मोठे पठार लागते. पण इथेही दोन points आहेत. एक म्हणजे आपण धबधब्याच्या अगदी वरच असतो जिथून धबधबा उगम पावतो. ह्या ठिकाणी आपण उगमाच्या पाण्यात मनमुराद खेळू शकतो व दुसरा म्हणजे जर पुढे चालत दुसऱ्या पठारावर गेलो तर धबधब्याचे पूर्ण दर्शन होते. हा धबधबा म्हणजे पूर्ण प्रवासाचा कळसाध्याय आहे. दुसरे म्हणजे इथे येण्यासाठी चालायची तयारी मात्र ठेवावी लागेल कारण रस्त्यापासून थोडे आत असे हे ठिकाण आहे . श्रावणात उन पाऊसाचा खेळ चालू असल्यामुळे आपल्याला इंद्रधनुष्य हि दिसते. ज्यांना फोटो काढण्याची आवड आहे अशा लोकांनी तर खास वेळ काढूनच यावे. एकूणच निसर्ग त्याच्या रंग रुपाची मुक्त उधळण चारही दिशांना करत असतो. पावसाळ्यात ह्या घाटातील प्रवास हा अत्यंत नेत्रसुखद व अवर्णनीय आहे. काही क्षण निसर्ग सानिध्यात घालवून, भरपूर प्राण वायूचा साठा बरोबर घेऊन जेव्हा आपण घरी परतु तेव्हा एक नवीन उत्साह, जोम आपल्याल्या मिळेल हे नक्की … येथे दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने जाता येते. तसेच येथे जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाची बस स्वारगेट पासून उपलब्ध आहे. येथे जाण्याचे दोन मुख्य पर्याय आहेत. १. सिंहगड रस्ता--खडकवासला धरण -- डोणजे फाटा -- खानापूर -- डावीकडे वळण घेतल्यावर पाबे घाट चालू होतो -- वेल्हे गाव -- केळद गाव -- मढे घाट (साधारण ६० की. मी.) खाली गूगल मॅप देत आहे त्यावरून पोहोचणे जाईल. https://goo.gl/maps/t8MSqpBMGmq9addq6 २. NH -४ -- खेड शिवापूर -- टोल -- उजवे वळण नसरापूर -- वेल्हे रस्ता -- केळद गाव -- मढे घाट (साधारण ८६ की. मी.) https://goo.gl/maps/B4DoMqoWpr3q9ez59 पूर्ण रस्त्यात बऱ्यापैकी छोटी छोटी खेडी लागतात व छोटी छोटी हॉटेल्स आहेत. पण विसावा नावाचे छोटेखानी हॉटेल वेल्हे गाव सुरु होतांना आहे तिथे मस्त जेवण व मिळते. ह्या ठिकाणी भेट द्यायला हरकत नाही. आणि इकडे जाताच आहात तर आजूबाजूलाही पाहण्यासारखे बरेच काही आहे. पुण्याहून जाताना किल्ले सिंहगड, खडकवासला धरण, पानशेत धरण, किल्ले राजगड, किल्ले तोरणा, गुंजवणी धरण या ठिकाणांना अवश्य भेट देता येइल.


#temple #madheghat #travel#traveldiaries #beautiful #maharashtra8 views0 comments
bottom of page